September 16, 2026

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण,लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

Please follow and like us:
Pin Share

वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला

पंढरपूर (दि,२३):-श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले.रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी आनंदाने विठुनामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी वाखरीत दाखल झाल्या. दरम्यान, दुपारी भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने निघाला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर माऊलीचा सोहळा गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्ळ्या रानात दाखल झाला. पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण पाहण्यासाठीवाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता माऊलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने रिंगण घातले.मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी माऊली… माऊलीचा गजर केला.पालखी सोहळा वाखरी मुक्कामी विसावलासंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण, तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले.यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला.

शुक्रवार (दि. २४) वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करीत आहेत. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाखरी पालखी तळावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सुलभ शौचालय, आरोग्य सुविधा, आपत्कालीन कक्ष, स्नानगृह, मसाज सुविधा , हिरकणी कक्ष , मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हॅंगर) मुख्यमंत्री आरोग्य रथ , मोबाईल चार्जिंग सुविधा तसेच स्वच्छता व वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Please follow and like us:
Pin Share

You may have missed

URL has been copied successfully!