May 14, 2025

काँग्रेस पक्षाकडे आदित्य फत्तेपूरकर यांनी केली विधानसभेच्या उमेदवारीची मागणी

पंढरपूर दि :- ०८ ऑगस्ट २०२४ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे आदित्य फत्तेपुरकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडून अधिकृत निवडणूक लढवण्यासाठी फत्तेपूरकर यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. पंढरपुरातील काँग्रेसचे निष्ठावंत घराणे म्हणून फत्तेपुरकर यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या 30 वर्षापासून फत्तेपुरकर हे पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. तालुका युवक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणून आदित्य फत्तेपूरकर यांनी काम पाहिले. तर पंढरपूर नगर परिषदेचे दोन वेळा नगरसेवक पद ही भूषवले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी देखील फत्तेपूरकर यांनी काम पाहिले आहे. याशिवाय पक्षात देखील सक्रियपणा कायम असल्याने त्यांनी उमेदवारीची मागणी केली. सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आदित्य फत्तेपुरकर यांची जिल्ह्यात ओळख आहे. याशिवाय धनगर समाजाचे नेते म्हणून आदित्य फत्तेपुरकर यांच्याकडे पाहिले जाते..नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मिळाले. त्यामुळे पंढरपूरची जागा काँग्रेसच्या माध्यमातून लढवली जावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यामध्येच पंढरपुरात काँग्रेसची प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवणारे आदित्य फत्तेपूरकर यांनी आता उमेदवारीची मागणी केली आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे फत्तेपुरकर यांनी निवडणूक उमेदवारी मागणीचा अर्ज दिला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव देवकते , माजी सरचिटणीस राजेंद्र मोरे , संतोष शिरगिरे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात कायमच काँग्रेसची वाटचाल राहिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवून काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित करेल. असा विश्वास याप्रसंगी आदित्य फत्तेपुरकर यांनी व्यक्त केला .