January 17, 2026

पुरातत्व विभागाने सर्वंकष आराखडा तात्काळ समितीकडे सादर करावा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर दि. 27: –  लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या  विठ्ठल-रुक्मिणी   मंदीराचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी  तयार करण्यात आलेल्या सर्वंकष आराखडा भारतीय पुरातत्व विभागाने तात्काळ मंदीर समितीकडे सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने व निर्देशास अनुसरुन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.के.पिसे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे, वास्तु विशारद प्रदिप देशपांडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे तसेच महावितरण, पाटबंधारे, नगरपालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.शंभरकर म्हणाले, विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचा सर्वकष आराखडा पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली  वास्तुविशारद यांच्याकडून तयार करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या मंजुरीनंतर  मंदीर समितीच्या मान्यतेने शासनाकडे  पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे. मंदीराचे पुरातन रुप, वैभव तसेच ठेवण्यात येणार आहे. यामध्ये  महाराज मंडळी, भाविक व नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्यांचा समावेश करावा.  तसेच पुरातत्व विभागाने अंदाजपत्रक सादर करताना सर्वसमावेश खर्चासहित सादर करावा.

यावेळी भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या विद्युत कनेक्शन दराबाबत महावितरणने तात्काळ  प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे सादर करावा. भीमा पाटबंधारे विभागाने विष्णुपद बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी बाबत आवश्यक कार्यवाही करावी. तुळशी वृंदावन देखभाल व दुरुस्तीसाठी मंदीर समितीकडे हस्तांतरण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी अशा, सूचनाही त्यांनी दिल्या.

मंदीर समिती मार्फत भाविकांच्या  सोयी सुविधेसाठी अल्पदारात देण्यात येणारा प्रसाद, श्रींचे फोटो व इतर विक्रीवरील मुल्यवर्धित कर माफ करण्यात यावा. यमाई तलाव येथील उपलब्ध शासकीय जमीन गोशाळेसाठी मंदीर समितीला देण्यात यावी असे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी यावेळी सांगितले.

श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेला भाविकांच्या सोयी सुविधेसाठी स्कायवॉक व पत्राशेड येथील दर्शन हॉल उभारण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी. तसेच सामाजिक संस्थेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाना ज्या पध्दतीने वीज आकारणी केली जाते तशीच वीज आकारणी भक्त निवास येथे विद्युत कंपनीने करावी असे,  श्री.ढोले यांनी यावेळी सांगितले.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!