October 20, 2025

आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर- नुकत्याच तामिळनाडू मध्ये झालेल्या ‘व्हर्च्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऍडव्हान्समेंट इन आर्टस, सायन्स अँड ह्युमिनिटीज २०२१’ मध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास ८३ विद्यार्थी आणि १८ प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

            कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वेरी कायमच अग्रेसर असते. तामिळनाडू येथील ‘असोसिएशन ऑफ ग्लोबल अकॅडेमिक अँड रिसर्च’ आणि ‘असोसिएशन ऑफ बायोलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू राज्यातील सॅक्रेड हर्ट कॉलेज, तिरूपत्तुर या ठिकाणी आयोजित केलेल्या (व्ही.आय.सी.ए.ए.एस.एच.-२०२१) या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या जवळपास ८३ विद्यार्थ्यांनी व १८ प्राध्यापकांनी मिळून २१ शोधनिबंध सादर केले. त्यापैकी चंद्रप्रभा अष्ठूरे, निकिता देवमारे आणि पूजा कांबळे या तीन विद्यार्थीनींना तसेच प्रा. सुभाष जाधव यांना उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी विशेष सन्मानित करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक व प्रेरणादायी मार्गदर्शनाच्या माध्यमातून संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे आणि मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रा.अविनाश पारखे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. त्यासाठी विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सध्या कोरोनाचा कालावधी सुरु असून अद्याप महाविद्यालये सुरु नाहीत तरी ऑनलाइन अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नित्य शिक्षणाबरोबरच अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे वेबिनार, करिअर गायडन्स सुरु असतानाच तामिळनाडू मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखविली. याचे विद्यार्थी व पालकांमधून विशेष कौतुक होत आहे. यावेळी बोलताना अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर म्हणाले की, ‘स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कायमच प्रोत्साहन देवून योग्य मार्गदर्शन केले जाते. त्याचेच फलित म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे एकूण ८३ विद्यार्थी व १८ प्राध्यापकांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आणि उत्कृष्ठ शोधनिबंध सादरीकरणाचा सन्मानसुद्धा मिळविला.’ विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या अशा सहभागातून स्वेरीच्या संशोधन संस्कृतीस अधिक पोषक वातावरण मिळत आहे.

Please follow and like us:
Pin Share