January 16, 2026

पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता

Please follow and like us:
Pin Share

सोलापूर, दिनांक 17 :- पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या मोठ्या वाऱ्यांना दहा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात व रांगेत उभे राहतात. वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूर येथे येतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस 2024 रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 110 कोटी चा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.

मुंबई येथे झालेल्या उच्च अधिकार समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक जिल्हा नियोजन अधकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहू नये व रांगेत भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी मागील अनेक वर्षापासून दर्शन मंडप व स्काय वॉक तयार करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला व भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर येथे पदभार घेतल्यापासून पाठपुरावा सुरू केला.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यामध्ये कोणत्याही भाविकाला दर्शन रांगेत त्रास होऊ नये या अनुषंगाने सर्व सोयी सुविधा रांगेत उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले होते. त्यानुसार पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर व सोलापूर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेला 129 कोटीचा आराखडा कार्यकारी समितीला सादर केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने या आराखड्याला मान्यता प्रदान केली. त्यानंतर हा आराखडा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सादर करण्यात आला व या समितीनेही या आराखड्याला मान्यता दिली.
जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शनमंड व स्काय वॉक आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधकार समितीने जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला 129 कोटीचा आराखडा सविस्तरपणे पाहून त्यातील 110 कोटीला मान्यता दिलेली आहे. उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य आसलेल्या राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल. साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीचे बैठक होऊन पंढरपूरच्या दर्शन मंडप व स्काय वॉक आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!