पंढरपूर शहर (प्रतिनिधी-अर्चना थोरात)-:- वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वातावरणात अनेक अनिष्ट बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती सह प्रदूषणीय आपत्ती मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. नगर विकास विभागाच्या मार्फत राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व नगरपंचायती मध्ये “अर्बन फॉरेस्ट” हा उपक्रम राबवण्यात येणार असून यात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र सांस्कृतिक कला मंच ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृह (शहरे), महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज मुळे मे महिन्यात, नोव्हेंबर मध्ये पाऊस पडणे तसेच पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्याप्रमाणेच ठाणे महापालिकेने चार ठिकाणी अर्बन फॉरेस्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. तरी राज्यातील सर्व शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्ष लागवड करावी. त्याप्रमाणेच राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टर पर्यंत वाढवावे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावेत. बांबू ही बहुपर्यायी तसेच पर्यावरण पूरक वृक्ष लागवड आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठे संकट आलेले आहे, शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने समिती गठीत केलेली आहे. या संकटाच्या काळात जी तातडीची मदत करावयाची होती ते शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करत असल्याचेही माहिती उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून लहान मुलांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी त्यांना शालेय जीवनापासूनच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व याबाबत जागृत केले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच आषाढी व कार्तिकी वारी पुरते पर्यावरण जागृतीचा संदेश देण्याशिवाय संपूर्ण वर्षभर सातत्याने असे उपक्रम राज्यभरात घेण्यासाठी प्रदूषण मंडळ व पर्यावरण विभागाने नियोजन करावे, यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व गड किल्ले ही खूप मोठी संपत्ती असून हे गड किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम लवकरच रायगड किल्ल्यापासून करावी. प्रदूषण मंडळाने पर्यावरण समतोल तसेच जनजागृतीसाठी अद्यावत तंत्रज्ञान चा वापर करावा. सध्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशल पद्धतीने करावा. पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. पर्यावरण पूरक विकासासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येकाने राज्याच्या सर्वांगीण विकासाचे वारकरी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असलेल्या बांबू लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्कृती कला मंचच्या वतीने किर्तन, भारुड, गोंधळ व पोवाडा या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कीर्तनकार प्रकाश खांडगे, मानसी बडवे, शैलजा खांडगे, योगेश चिकटगावकर, शाहीर प्रवीण जाधव यांचा सन्मान उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय तसेच सर्व मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरात पावली केली. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी या पर्यावरण शिक्षण उपक्रमाचा समारोप झाला.
प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव एम.डी. सिंह यांनी प्रस्ताविक केले तर आभार संजय भुस्कुटे यांनी मानले.






More Stories
पंढरपूर अर्बन बँकेतर्फे कै.देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे आयोजन
संत नामदेव महाराज पालखीचे आळंदीकडे प्रस्थान50 दिंड्यांसह 3 हजार भाविकांचा सहभाग
बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!