पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न

Spread the love

पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी
      “वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला हवा. आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करायला हवे, तसेच डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत” असे प्रतिपादन डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केले.
      दिनांक २० जानेवारी रोजी पंढरपूर येथे डिजिटल मीडिया संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. त्यांना या क्षेत्रातील संधी येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महा अधिवेशन कनेरी मठ कोल्हापूर येथे होणार आहे त्याचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.
     डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जेष्ठ पत्रकार रवींद्र चिंचोलकर, जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे, डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक सुनील उंबरे, सल्लागार राजकुमार शहापूरकर, नागेश सुतार, महालिंग दुधाळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी तालुका अध्यक्ष तानाजी जाधव तसेच विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी अभिराज उबाळे, संतोष रणदिवे, अपराजित सर्वगोड, सचिन कांबळे, चैतन्य उत्पात, अमर कांबळे, विनोद पोतदार, सचिन माने, रामदास नागटिळक, आणि सर्व प्रकारच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करणारे पत्रकार डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सुरुवातीला अध्यक्ष राजा माने व उपस्थित मान्यवर आणि सर्व संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली ज्यामधून उपस्थित सर्व नवोदित पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रातील स्थित्यंतरे, संधी आणि आव्हाने याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अशोक गोडगे यांची राज्यसल्लागार सुनील उंबरे यांची राज्य संघटक पदी नियुक्ती करण्यात आली तसेच मोहोळ तालुका अध्यक्षपदी दिनेश सातपुते, तर पद्माकर सोनटक्के यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
    डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महा अधिवेशन कनेरी मठ कोल्हापूर येथे दिनांक 29 जानेवारी रोजी होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक बाबींवर चर्चासत्र परिसंवाद असे अनेक उपक्रम या अधिवेशनात होणार आहेत त्यामुळे सर्व पत्रकारांनी या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी यावेळी केले.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले तर पंढरपूर शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.

Leave a Comment