October 19, 2025

ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण-राज्य मंत्री देसाई यांची आढावा बैठकीत सूचना

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर, दि. ८: ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश 30 टक्के राहील याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह अकलूज येथे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणश विभागांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे, राज्य कर उपायुक्त सचिन बनसोडे, जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. डी. शिंदे, उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते उपस्थित होते.

            राज्यमंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील मुला-मुलींना सक्षम करण्यासाठी कौशल्‍य विकास विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवेशी निगडित प्रशिक्षणाचा समावेश प्राधान्याने असावा. सोलापूर जिल्ह्याला अन्य राज्यांची सीमा लागून आहे. सीमा भागातून होणारी चोरटी मद्य  वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. पणन विभागाने शेतकऱ्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना उपलब्ध करून द्याव्यात  अशा सूचनाही त्यांनी यावेळी  दिल्या.

राज्याच्या ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील विविध समस्या असून, पोलिसांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील  पोलीस वसाहतीचे प्रस्ताव तत्काळ पाठवावेत. प्रस्तावाचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पंढरपूर येथील पोलीस वसाहतीबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजनमधून करण्यात आलेल्या खर्च तसेच पणन महामंडळामार्फत देण्यात येणारे अनुदान व त्याचा विनियोग याबाबतही आढावा घेण्यात आला.

Please follow and like us:
Pin Share